सोलापूर वनविभाग

तुळशी वृंदावन

पंढरपूर हे भू-वैकुंठ मानले जाते. आळंदी हे ज्ञानपीठ, कोल्हापूर हे शक्तीपीठ तसे पंढरपूर हे भक्तीपीठ आहे. अनेक संतांनी आपल्या अभंगांमधून पंढरीचे अनन्यसाधारण महत्त्व विषद केले आहे. पंढरीचा पांडूरंग, चंद्रभागा, भक्त पुंडलीक, संत जनाबाई या अनेक संतांनी पंढरीचा महिमा गायला आहे. अशा या संतांच्या वर्णनातून नाणावलेल्या पंढरपूरमध्ये टाकळीचा ओढा होता. स्थानिक स्वराज्य संस्थेने पंढरपूरच्या पिण्याच्या पाण्याची सोय करण्यासाठी इ.स. १८७४ मध्ये ओढ्याला अडवून तलाव तयार केला आहे. हा तलाव यमाई तलाव म्हणून ओळखला जातो. यामध्ये अनेक प्रकारच्या वनस्पती, पक्षी, शेवाळे आणि जलचर यांची विविधता आढळते. याच तलावाच्या पश्चिमेला असलेल्या जागेमध्ये तुळशी वृंदावन उद्यानाची निर्मिती करण्यात आलेली आहे. 

पंढरीचा पांडुरंग हा कृष्णाचा अवतार समजला जातो, कृष्णाला अत्यंत प्रिय असणारी वनस्पती म्हणजेच तुळस. तुळशीला वारकरी सांप्रदायामध्ये खूपच महत्त्व आहे. तुळशीचे भक्तीभावाने जसे वर्णन सापडते, तसे तुळशीला विज्ञानाच्या कसोटीवर देखील अनन्यसाधारण महत्त्व आहे. अनेक प्रकारचे त्वचा रोग, काही असाध्य रोगांवर तुळस गुणकारी असल्याचे आयुर्वेद सांगतो. वारकरी या तुळशीचे रोपटे प्रत्येक दिंडीमध्ये मस्तकावर घेऊन नाचतात. वारकरी संप्रदायामध्ये टाळ, वीणा, पताका यांच्याबरोबरच तुळशीलादेखील अनन्यसाधारण महत्त्व आहे. प्रत्येक वारकर्याच्या गळ्यामध्ये तुळशीच्या मण्यांची माळ असते. पांडुरंगालाही तुळशीची माळ आवर्जून घातली जाते. 

पंढरीची भक्तीपीठ म्हणून असलेली महती आणि पांडूरंगाचे तुळशीबरोबर असलेले जिव्हाळ्याचे नाते यांचा सुंदर मिलाफ करून या तुळशीच्या उद्यानाची निर्मिती करण्यात आलेली आहे. या उद्यानात आठ प्रकारच्या तुळशींची लागवड करण्यात आलेली आहे. त्याचसोबत प्रसिद्ध अशा आठ संतांच्या सुंदर अशा मुर्तींचीही स्थापना करण्यात आलेली आहे. उद्यानाच्या भिंतींवर सर्वपरिचीत अशा संतांची चित्रे व त्यांच्या आयुष्यातील घटना चितारण्यात आलेल्या आहेत

तुळशी वृंदावनाची वैशिष्ट्ये

श्री यंत्र

या उद्यानातील एक आकर्षण आहे श्री यंत्राची रचना. श्री यंत्र हे त्रिपुरा शक्तीचे प्रतीक आहे. हे यंत्र भगवती, श्रीविद्या व त्रिपूरा सुंदरीच्या साधनेमध्ये अत्यंत प्रभावी मानले जाते. समृद्धीचे प्रतीक असणाऱ्या या यंत्रामध्ये ३३ कोटी देवांचा वास असल्याचे मानले जाते. अशा या यंत्राची प्रतिकृती तुळशी वृंदावनामध्ये करण्यात आलेली आहे. या यंत्राच्या त्रिकोणांमध्ये गुलाब, मोगरा, सदाफुली, विविध रंगांच्या शेवंती अशा शोभिवंत फुलझाडांची लागवड करण्यात आली आहे. त्याचबरोबर बकुळ, पारिजातक, सोनचाफा यांचीही लागवड करण्यात आलेली आहे. 

विविध प्रकारच्या तुळशी

 

पंढरीचा पांडुरंग हा कृष्णाचा अवतार समजला जातो, कृष्णाला अत्यंत प्रिय असणारी वनस्पती म्हणजेच तुळस. तुळशीला वारकरी सांप्रदायामध्ये खूपच महत्त्व आहे. तुळशीचे भक्तीभावाने जसे वर्णन सापडते, तसे तुळशीला विज्ञानाच्या कसोटीवर देखील अनन्यसाधारण महत्त्व आहे. अनेक प्रकारचे त्वचा रोग, काही असाध्य रोगांवर तुळस गुणकारी असल्याचे आयुर्वेद सांगतो. वारकरी या तुळशीचे रोपटे प्रत्येक दिंडीमध्ये मस्तकावर घेऊन नाचतात. वारकरी संप्रदायामध्ये टाळ, वीणा, पताका यांच्याबरोबरच तुळशीलादेखील अनन्यसाधारण महत्त्व आहे. प्रत्येक वारकर्याच्या गळ्यामध्ये तुळशीच्या मण्यांची माळ असते. पांडुरंगालाही तुळशीची माळ आवर्जून घातली जाते. याच गोष्टीचा विचार करून या उद्यानामध्ये भारतामध्ये सापडणाऱ्या आठ प्रकारच्या तुळशींची लागवड करण्यात आलेली आहे. या तुळशी पुढीलप्रमाणे …

श्री विठ्ठल मुर्ती

या उद्यानाच्या पूर्व दिशेला पंढरपूरच्या मंदिरातील विठ्ठल मुर्तीची भव्य अशी प्रतिकृती उभारण्यात आलेली आहे. ही मुर्ती अत्यंत देखण्या अशा चबुतऱ्यावर बसवलेली आहे. जे जे स्कूल ऑफ आर्टस् च्या विद्यार्थ्यांनी बनवलेली ही मुर्ती या उद्यानातील एक प्रमुख आकर्षण आहे

महाराष्ट्रातील संतांच्या मुर्ती

या उद्यानात असलेल्या श्री यंत्राच्या प्रतिकृतीच्या मध्यभागी कारंजे असून, या यंत्राच्या सभोवताली आठ संतांच्या सुबक आणि देखण्या अशा संगमरवरी मुर्तींची प्रतिष्ठापना केलेली आहे. 

खुले सभागृह

या उद्यानातील विठ्ठल मुर्तीच्या समोर खुले सभागृह (amphitheater) बांधलेले आहे. हे सभागृह वर्तुळाकार असून तीन टप्प्यांमध्ये आहे. या सभागृह किर्तन, भजन अथवा तत्सम कार्यक्रमांसाठी व चर्चांसाठी उपलब्ध करून दिले जाते

प्रवेशद्वार

या उद्यानाच्या सुरवातीलाच भव्य असे प्रवेशद्वार असून त्याच्या दोन्ही बाजूला गोपूर सदृश्य बांधकाम केलेले आहे. या दरवाज्याची महिरप व छत देखील अतिशय कलात्मक असे आहे.

कारंजे

या उद्यानात असलेल्या श्री यंत्राच्या प्रतिकृतीच्या मध्यभागी अतिशय सुंदर असे कारंजे बसवण्यात आले आहे. या मध्ये देखणे असे रंगीत दिवे लावलेले आहेत. सायंकाळी हे रंगीत दिवे सुरू झाल्यावर सर्वच पर्यटकांचे लक्ष वेधून घेतात. 

म्युरल चित्रे

या उद्यानातले अजून एक आकर्षण म्हणजे म्युरल चित्रे. विठ्ठलमुर्तीच्या चबुतऱ्याच्या चारही बाजुला सुंदर अशी म्युरल्स बसवण्यात आलेली आहेत. वारकरी संप्रदायातील महिला तुळशीचे रोप घेऊन वारी करतानाचे, वारकरी आषाढीदिंढीमध्ये संत तुकाराम व संत ज्ञानेश्वरांच्या पादुका बैलगाडीच्या रथामधून नेतानाचा प्रसंग असे विविध प्रसंग या म्युरल्सच्या माध्यमातून रेखलेले आहेत. संत तुकारामांच्या आयुष्यातले विविध प्रसंग देखील देखण्या अश्या म्युरलच्या माध्यमातून मांडले आहेत. 

Scroll to Top

राम तुळस

राम तुळस ही मोठ्या पानांची, उंच व रानटी पद्धतीने वाढणारी तुळस आहे.  याची पाने पोपटी रंगाची असतात. या तुळशीच्या पानांना लवंग सदृश, मसालेदार असा सुवास येतो. पोटाच्या विकारांसाठी ही तुळस उपयुक्त आहे. या तुळशीला ‘लवंगी तुळस’, असेही संबोधले जाते

कृष्ण तुळस

या तुळशीचे खोड, पाने, व मंजिऱ्या कमी-अधिक प्रमाणात गडद जांभळ्या रंगाची असतात. उन्हात वाढलेल्या व जुन्या झाडांमध्ये हा रंग जास्त ठळकपणे उठून दिसतो. याच तुळशीला ‘काळी तुळस’, असेही संबोधले जाते. या तुळशीचे पाने खाल्ल्याने सर्दी-खोकला, ताप यावर लवकर आराम मिळतो

वैजयंती तुळस

अतिशय तीव्र असा सुवास असलेली ही तुळस विशेष औषधी आहे. याची फुले लाल रंगाची असतात. पानांचा चोथा त्वचाविकारांवर वापरला जातो. तसेच न भरणाऱ्या जखमांवरही हा पाला लावला जातो. जंगली पद्धतीने वाढणाऱ्या या तुळशीचे ‘रान तुळस’ असेही नाव आहे

पुदिना तुळस

स्वयंपाकात स्वाद आणि सुगंधासाठी वापरली जाणारी तुळस. याची उंची अतिशय कमी असते. याची पाने लहान व लंबगोलाकार असतात. पानांचा पृष्ठभाग हा थोडा खडबडीत असतो. पाने चुरल्यावर अतिशय सुंदर असा वास पसरतो

हनुमान तुळस

याची पाने इतर तुळशींच्या मानाने लांब असतात. ही पाने चुरल्यास त्यांचा मारीगोल्डच्या फुलांसारखा वास येतो.

बेसील तुळस

स्वयंपाकात स्वाद आणि सुगंधासाठी याची पाने वापरली जातात. 

लेमन तुळस

याची पाने देखील थोडी लांबट आकाराची असतात. मंद सुगंध असतो. पाने चूरल्यास लिंबासारखा वास येतो

सब्जा तुळस

आपल्या येथे सब्जाचे झाड खास त्याच्या बियांसाठी लावले जाते. शरीराला थंडावा देणारा सब्जा उन्हाळ्यात महत्वाचा ठरतो. जागोजागी मिळणारा वर्ल्ड फेमस फालुदा, सब्जा शिवाय बनू शकत नाही. या तुळशीची पाने व बिया सरबतात घालून प्यायल्याने उष्णता कमी होते. विंचू दंशावर सब्जा तुळशीचा पाला चुरडून लावला जातो